गीत ध्वनीमुद्रणाने 'जगा चार दिवस' चित्रपटाचा मुहूर्त...
February 10, 2024
0
गीत ध्वनीमुद्रणाने 'जगा चार दिवस' चित्रपटाचा मुहूर्त...
आज मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. मराठीची पताका साता समुद्रापार आयोजित केल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये फडकत असून, तिथल्या मानाच्या पुरस्कारांवरही मराठी चित्रपट नाव कोरण्यात यशस्वी होत आहेत. विषय आणि आशयाची अचूक सांगड घालत येणारे चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी जगण्याचा सकारात्मक मंत्र देणारा 'जगा चार दिवस' हा आगामी मराठी चित्रपटही याच पठडीतील आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच गीत ध्वनीमुद्रणाने करण्यात आला आहे.
जागृती एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या 'जगा चार दिवस'चे निर्माते मुकूंद महाले आणि जागृती राहुल मोरे आहेत. डॅा. शांताराम दादा सोनावणे आणि राहुल सोनावणे यांचे देवा चलचित्र आणि मयुरेश फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंट या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. अंधेरीतील स्पेस म्युझिक स्टुडिओमध्ये 'मी तुला पाहिले, तू मला पहिले...' या गाण्याच्या रेकॅार्डिंगने या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी परभणीचे माजी खासदार अॅड. तुकाराम रेंगेपाटील, निर्माते मुकूंद महाले, सहनिर्माते डॅा. शांताराम दादा सोनावणे, राहुल सोनावणे, दिग्दर्शक सरकार आर. पी., अभिनेते गुरू आनंद तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. गीतकार डॅा. श्रीकृष्ण राऊत यांनी 'मी तुला पाहिले, तू मला पहिले...' हे गाणं लिहिलं असून, संगीतकार दिनेश अर्जुना यांनी स्वप्नील बांदोडकर आणि डॅा. नेहा राजपाल यांच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटाच्या नायक-नायिकेच्या मनातील भावना व्यक्त करणारं हे अर्थपूर्ण रोमँटिक साँग आहे. प्रसंगानुरूप हे गाणं पटकथेत गुंफण्यात आलं आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर लगेचच चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
सस्पेन्स हॅारर कॅामेडी फॅमिली एन्टरटेनर असलेल्या 'जगा चार दिवस'चे दिग्दर्शक सरकार आर. पी. असून, कथालेखनही त्यांनीच केलं आहे. या चित्रपटाची पटकथा व संवादलेखन मुकुंद महाले यांनी केलं आहे. गीतकार डॅा. श्रीकृष्ण राऊत यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार दिनेश अर्जुना यांनी संगीत साज चढवला आहे. छायांकनाची जबाबदारी डिओपी एच. डी. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवम गौड या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.