खुशबू आणि तितिक्षा तावडेची पारिवारिक मकरसंक्रांत*
January 09, 2024
0
*खुशबू आणि तितिक्षा तावडेची पारिवारिक मकरसंक्रांत*
सण कुठचा ही असो, परिवारासोबत साजरा केला की त्याचा आनंद दुप्पट होतो. मालिकांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचे मन जिंकलेल्या तावडे बहिणी खुशबू आणि तितिक्षाने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या.
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील उमा म्हणजेच खुशबू तावडेने सांगितले, “खूप खास आहे ही मकरसंक्रांत आमच्यासाठी कारण नवीन घरात पहिला सण आणि वर्षाचा ही पहिला सण आहे. नवीन घरात मार्गशीर्षातल्या गुरुवारी स्थलांतर केले. हंगाम बदलतो त्यासोबत खाण्या-पिण्याच्या सवयी ही बदलतात. तीळ आणि गुळाचा खाण्यात समावेश होतो. ह्या काळात मी काळे कपडे परिधान करते जसे मकरसंक्रांतीच्या दिवशी सगळे काळे कपडे घालतात कारण त्याने उब मिळते. हळदी-कुंकू माझ्या सासरी म्हणजे सायनला होतं, एकदम पारंपरिक पद्धतींनी साजरा केली जाते मकरसंक्रांत. माझा मुलगा राघव थोडं बोलायला लागला आहे तर त्याच्या तोंडातून तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे कुतहूल आहे मला.”
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मधली नेत्रा आणि महाराष्ट्राची लाडकी तितिक्षा तावडे म्हणते, मकरसंक्रांत मी कुटुंबासोबत साजरी करते. माझी लहानपणाची आठवण आहे जेव्हा मी, खुशबू, आई आणि बाबा आम्ही एकत्र बसून तिळगुळाचे लाडू बनवायचो. मला लक्षात आहे मला ते नीट बनवायला जमायचे नाही आणि सारण गरम असल्यामुळे ते लाडू माझ्या हातात फुटायचे. गेले काही वर्षापासून मी उत्तम तीळ गुळाचे लाडू बनवते. आई- बाबा दुकान बंद करून उशिरा रात्री परतयायचे पण एकत्र बसून लाडू बनवायचा कार्यक्रम दरवर्षीचा ठरलेला होता. मला तिळगुळाचे लाडू प्रचंड आवडतात मी एका खेपेत डब्बा भरून लाडू संपवायचे. ह्या थंडीच्या ऋतूत तिळाच्या लाडवाचे फायदे ही आहे ते आपल्या शरीराला उब देतात. ह्या वर्षी सुद्धा आई-बाबां सोबत सण साजरा करायचा हाच बेत आहे. मी कधी पतंग उडवले नाही पण खुशबू जेव्हा गुजरातला शिकत होती तेव्हा तिने पतंग उडवले आहेत आणि पतंग उडवण्या मागचं ही कारण आहे की तुमच्या शरीराला सूर्याची उष्णता मिळाली पाहिजे. तुम्हा सर्वांना आमच्या कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! “तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि बघायला विसरू नका
'सारं काही तिच्यासाठी' ७:३० वाजता आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' रात्री १०:३० वाजता सोमवार ते शनिवार तुमच्या लाडक्या झी मराठीवर.