इंडियन हेरिटेज सोसायटीच्या मुंबई संस्कृती महोत्सवाचे 32 वे सादरीकरण : सार्वत्रिक शांततेसह वारसा सामंजस्य*
January 06, 2024
0
*इंडियन हेरिटेज सोसायटीच्या मुंबई संस्कृती महोत्सवाचे 32 वे सादरीकरण : सार्वत्रिक शांततेसह वारसा सामंजस्य*
इंडियन हेरिटेज सोसायटी (IHS) द्वारे सादर करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित मुंबई संस्कृती महोत्सवाचे 32 वे सादरीकरण 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी फोर्ट, मुंबई येथील प्रेक्षणीय अशा टाऊन हॉलच्या साक्षीने (एशियाटिक लायब्ररी) प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात येणार आहे . या महोत्सवाची सुरुवात १३ जानेवारी रोजी प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया (सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे)यांच्या 'कॉन्फ्लुएन्स - म्युझिक फॉर पीस अँड हार्मनी ' अर्थात 'संगम - शांती आणि सुसंवादासाठी संगीत ' या कार्यक्रमाने होईल . दुसर्या दिवशी म्हणजे १४ जानेवारी (रविवार) विदुषी अश्विनी भिडे देशपांडे (जयपूर-अत्रौली घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे प्रशंसनीय प्रवर्तक) आणि पंडित संजीव अभ्यंकर (मेवाती घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक) यांचा 'भक्ती संगम ' हा कार्यक्रम सादर होईल. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि HSBC द्वारे प्रायोजित, महाराष्ट्र पर्यटनाचे सहकार्य लाभलेल्या, IHS द्वारे सादर केला जाणाऱ्या 'मुंबई संस्कृती'या महोत्सवाचे नॉर्दर्न लाइट्स द्वारे व्यवस्थापन करण्यात येणार आहे .
मुंबई संस्कृती या महोत्सवाला १९९२ मध्ये सुरुवात झाली . १९९१ या वर्षी इंडियन हेरिटेज सोसायटीच्या अध्यक्षा अनिता गरवारे यांनी आताचा ऐतिहासिक परिसर अर्थात बाणगंगा तलाव जतन करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती. त्यातून १९९२ पासून बाणगंगा महोत्सवाला सुरुवात झाली. "“सर्व मुंबईकर नागरिकांनी बाणगंगा तलावाबद्दल ऐकले होते ,परंतु फार कमी लोकांना त्याचे स्थान, इतिहास आणि महत्त्व माहीत होते . एखाद्या गोष्टीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी लाईव्ह म्युझिक हा एक उत्तम मार्ग आहे ,असे आम्हाला वाटले ," अनिता गरवारे म्हणाल्या. इंडियन हेरिटेज सोसायटीने बाणगंगा महोत्सव म्हणून ज्याची सुरुवात केली, तो उत्सव आता प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त मुंबई संस्कृती महोत्सव म्हणून नावारूपाला आला असून त्यात स्थापत्यशास्त्र आणि सांस्कृतिक वारसा यांचे एकत्रीकरण झाले आहे .
शहरातील वारसा म्हणून जतन करण्यात येणाऱ्या महत्वाच्या वास्तूंचे पुनरुज्जीवन करण्यात IHS महत्त्वाची भूमिका बजावते. संगीताच्या माध्यमातून मुंबईच्या इतिहासाची आणि संस्कृतीची सातत्याने जाणीव करून देण्यासाठी IHS वचनबद्ध असून आपल्या समृद्ध वारशाबद्दल जागरुकता वाढवण्याचा प्रयत्न करते. जे आपल्याला वारशाने मिळाले आहे , त्याचे संवर्धन,पुनर्संचयन करणे आणि ते भविष्यातील पिढ्यांपर्यंत प्रसारित करण्यासाठीI HS सक्रियपणे कार्य करते," अनिता गरवारे म्हणतात. 'लाइव्ह म्युझिक टू सेव्ह अवर हेरिटेज' या मिशनमध्ये रुजलेला, यंदाचा मुंबई संस्कृती महोत्सव 'वैश्विक शांतता' या संकल्पनेला महत्व देत आहे . बासरी, तबला, मृदंगम, तालवाद्य, सतार, हार्मोनिअम, पखवाज गिटार आणि अशा अनेक विविध प्रकारच्या वाद्यांचा ताळमेळ सांस्कृतिक धागा जोडण्यासाठी सज्ज झाला आहे.
वारसा या संकल्पनेने बदलत्या काळाशी जुळवून घेतले पाहिजे असे अनिता गरवारे यांचे मत असून आजच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हा वारसा विश्वासाच्या नात्यावरच पुढे नेला जात असतो., असेही त्या सांगतात. आजच्या वेगवान जगात शास्त्रीय संगीताच्या प्रशंसेची आव्हाने स्वीकारून, IHS टीम सक्रियपणे प्रेक्षक वर्गाचा विस्तार करण्यात गुंतलेली आहे.त्या संदर्भात संस्थेतर्फे केल्या जाणाऱ्या प्रयत्नात महाविद्यालये, संगीत शाळा आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचणे, सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर करणे आणि मुंबई संस्कृती महोत्सवात विनामूल्य प्रवेश देऊन अधिक समावेशक सांस्कृतिक अनुभवाची खात्री देणे या प्रयत्नांचा समावेश आहे.
महोत्सवाची सुरुवात सुप्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया हे भारतीय शास्त्रीय संगीताने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतील आणि नंतर त्यात फ्यूजन आणि लोकसंगीत यांचाही समावेश असेल .ते म्हणतात ,"हे व्यासपीठ आपल्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या भारतीय शास्त्रीय संगीतावर प्रकाश टाकण्यासाठी एक आदर्श मंच उपलब्ध करून देते . या प्रभावी उपक्रमासाठी मी इंडियन हेरिटेज सोसायटीचे कौतुक करतो, विविध श्रोत्यांशी एकरूप होऊन आपल्या वारशाची सांस्कृतिक समृद्धी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास ही संस्था सज्ज आहे.” राकेश चौरसिया यांना मृदंगमवर श्रीदार पार्थसारथी, तबल्यावर ओजस अधिया, तालवाद्यांसाठी शिखर नाद कुरेशी, गिटारवर संजय दास आणि बासरीवर रितिक चौरसिया साथसंगत करणार आहेत.
विदुषी अश्विनी भिडे देशपांडे आणि पंडित संजीव अभ्यंकर यांचा ‘भक्ती संगम’ हा कार्यक्रम दोन्ही कलाकारांच्या अनोख्या शैली, घराणे आणि ख्याल, भजन, स्तोत्र आणि स्तुती अशा विविध संगीत शैलींमध्ये अंतर्भूत असलेल्या भक्तीचा खरा संगम असल्याचे आश्वासन देणारा ठरेल. या कार्यक्रमासाठी .तबल्यावर अजिंक्य जोशी, हार्मोनियमवर अभिनय रवंदे, बासरीवर अमर ओक, पखवाजवर ओंकार दळवी, साइड रिदमवर उद्धव कुंभार हे कलाकार साथसंगत करणार आहेत आणि अवंती पटेल सूत्रसंचालन करणार आहे. "वारसा हा नेहमीच स्थिर स्थापत्यशास्त्र तसेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासारख्या जिवंत परंपरेतून बोलतो. IHS चा मुंबई संस्कृती महोत्सव हा उपक्रम स्थिर संगीत (स्थापत्यशास्त्र ) आणि प्रवाही स्थापत्यशास्त्र (संगीत)या दोन्ही गोष्टींना सुंदरपणे एकत्र आणतो,"अश्विनी भिडे -देशपांडे यांनी स्पष्ट केले. यालाच जोडून पंडित संजीव अभ्यंकर म्हणतात ,"भक्तीचा पैलूही वास्तुकलाशास्त्र किंवा शास्त्रीय संगीताप्रमाणेच 'वारसा' आहे."
सामाजिक वियोगाचे वर्चस्व असलेल्या युगात, मुंबई संस्कृती महोत्सव दिग्गजांच्या प्रत्यक्ष सादरीकरणाचे साक्षीदार होण्याची अनोखी संधी अगदी विनामूल्य उपलब्ध करून देत आहे . मंत्रमुग्ध करणार्या कामगिरीच्या पलीकडे, हा कार्यक्रम एका उदात्त हेतूसाठी निर्मिला आहे आणि ते उदात्त उद्दिष्ट म्हणजे आपला वारसा जतन करणे. ही एक अतुलनीय महत्वाची घटना असून ही संधी तुम्ही अजिबात चुकवू नका.