*सायली आणि सिद्धार्थच्या मनातले 'फुलपाखरू'*
December 18, 2023
0
*सायली आणि सिद्धार्थच्या मनातले 'फुलपाखरू'*
'सांग ना मनाला माझ्या कसं सावरू' म्हणणारी चुलबुली सायली संजीव आणि मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर यांची गोड जोडी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. निसर्गाच्या कुशीत मनमुराद आनंद लुटत, एका सुंदर प्रवासात सायली आणि सिद्धार्थ प्रेमात पडताना दिसत आहेत. काय बरं नेमकं चाललं असेल?
कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'ओले आले' या आगामी चित्रपटात सायली आणि सिद्धार्थ ही युथफुल जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दोन विरुद्ध स्वभावधर्माच्या तरीही एकमेकांच्या प्रेमात असणाऱ्या या जोडीचा धम्माल प्रवास आपल्याला ५ जानेवारी २०२४ पासून चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.
'एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटातून सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आपल्या भेटीला येणार आहेत. संपूर्ण परिवारासाठी निखळ मनोरंजन हा या चित्रपटाचा गाभा असून नानांसोबत मकरंद अनासपुरे, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल.
विशेष म्हणजे बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर यांच्या संगीताची जादू आता मराठीतही ऐकायला मिळणार असून 'ओले आले' या मराठी चित्रपटाद्वारा ते प्रथमच मराठी प्रेक्षकांच्या मनावर गरुड घालायला सज्ज आहेत. मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या या गाण्याला रोहित राऊत यांचा स्वरसाज लाभला आहे.