रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांचा 'रीलस्टार'
December 17, 2023
0
रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांचा 'रीलस्टार'
'रीलस्टार'चा मुहूर्त थाटात संपन्न...
पूर्वीच्या जमान्यात रीळांवर सिनेमा दाखवला जायचा, पण काळानुरुप सिनेमा बदलला असून, आज तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचत आहे. आज सिनेमांमधून रीळ गायब झाली असली तरी तुमच्या आमच्या सर्वांच्याच जीवनात 'रील्स'च्या माध्यमातून ती आजही कायम आहे. छोट्या-मोठ्या रिल्स बनवून त्या द्वारे काही ना काही संदेश देत मनोरंजन करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरातील गल्ल्यांपासून खेड्यांतील वाड्या-वस्त्यांमध्ये रील्सचं फॅड पसरलं आहे. रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांचा प्रवास 'रील स्टार' या आगामी चित्रपटाद्वारे रसिकांसमोर येणार आहे. 'रील स्टार' या मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला.
जे ५ एन्टरटेन्मेंट आणि इनिशिएटिव्ह फिल्म या बॅनर्सखाली निर्माते जोस अब्राहम यांनी 'रीलस्टार' या आगामी चित्रपटाची निर्मिती करण्याचे शिवधनुष्य उचललं आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे. मराठीसह हिंदीतही रिलीज झालेल्या 'अन्य' या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस 'रीलस्टार'चं दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन रॉबिन वर्गीस व सुधीर कुलकर्णी यांनी केलं आहे. रील्स करणाऱ्या तळागाळातील कलाकारांनी केलेल्या स्वप्नांचा पाठलाग म्हणजेच 'रीलस्टार' हा चित्रपट आहे. स्मार्ट फोनच्या आजच्या जमान्यात रील स्टार बनण्यासाठी कोणतंही वेगळं प्रशिक्षण घ्यावं लागत नाही, पण रील बनवणाऱ्या स्टार्सचा प्रवासही वाटतो तितका सोपा मुळीच नसतो. रील स्टार बनण्यापर्यंत त्यांना करावा लागणारा संघर्ष आणि स्वप्नांचा पाठलाग करताना मोजावी लागणारी किंमतच त्यांना खऱ्या अर्थाने 'रील स्टार' बनवतात.
या चित्रपटातही काहीसं अशाच प्रकारचं कथानक पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरात सुरू आहे. हा चित्रपट खऱ्या अर्थाने रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांच्या कलेला करण्यात आलेला एक प्रकारचा सलाम असल्याचं सांगत दिग्दर्शक सिम्मी जोसेफ आणि रॅाबिन वर्गिस म्हणाले की, आजच्या पिढीतील कलाकारांची कथा यात आहे. कलेच्या माध्यमातून समाजातील विविध मुद्द्यांना स्पर्श करताना आजच्या कलाकारांच्या मानसिकतेचा आढावा यात घेण्यात आला आहे. शीर्षक 'रीलस्टार' असणाऱ्या या चित्रपटाचं कथानक खऱ्या अर्थानं स्टार असून, यातील कलाकार कथानकाला न्याय देण्यासाठी सक्षम असल्याची भावना यावेळी निर्माते जोस अब्राहम यांनी व्यक्त केली.
मराठीतील आघाडीचे निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण मंजुळे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून उर्मिला जगताप, प्रसाद ओक, रुचिरा जाधव, मिलिंद शिंदे, स्वप्नील राजशेखर, सुहास जोशी, विजय पाटकर, कैलास वाघमारे, महेश सुभेदार, शिवाजी पाटने, राजेश मालवणकर, सरीता मंजुळे, महेंद्र पाटील, कल्पना राणे, दीपक पांडे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर आदी कलाकार आहेत. या जोडीला अर्जुन गायकर, तनिष्का म्हसदे या दोन बालकलाकारांचा अभिनयही पाहायला मिळेल. डिओपी शिनोब यांनी सिनेमॅटोग्राफी, तर समीर चिटणवीस यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. महेंद्र पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर, अनिरुद्ध दुभाषी निर्मिती व्यवस्थापक, तर नंदू आचरेकर सहदिग्दर्शक आहेत. गुरु ठाकूर, मंदार चोळकर व प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार विनू थॅामस यांनी संगीतसाज चढवला आहे. रंगभूषा भागवत सोनावणे यांनी केली असून, वेशभूषा राणी वानखडे यांनी केली आहे.