*'यदा कदाचित रिटर्न्स' नाटकाचा शंभरावा प्रयोग*
December 05, 2023
0
*'यदा कदाचित रिटर्न्स' नाटकाचा शंभरावा प्रयोग*
*श्याम बेनेगल, गोविंद निहलानी आणि सचिन पिळगावकरांच्या प्रमुख उपस्थितीत रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये रंगला प्रयोग*
लेखन-दिग्दर्शनासोबतच विविध व्यक्तिरेखा साकारत रसिकांचे मनोरंजन करणारा रंगकर्मी संतोष पवारच्या 'यदा कदाचित' या नाटकाने मराठी रंगभूमीवर विक्रमी घोडदौड केली होती. मागील काही दिवसांपासून संतोषच्या 'यदा कदाचित रिटर्न्स' या नाटकाने रसिकांवर मोहिनी घातली आहे. नुकताच या नाटकाने शंभर प्रयोगांचा टप्पा पार केला. या नाटकाने शंभराव्या प्रयोगाचे औचित्य साधत ऐतिहासिक कलाकृतींचे साक्षीदार असलेल्या रॉयल ऑपेरा हाऊस या वास्तूत सादरीकरणाचा मान पटकावला असून हा दिमाखदार सोहळा मराठी-हिंदी सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांच्या हाऊसफुल उपस्थितीत संपन्न झाला.
'यदा कदाचित रिटर्न्स' या नाटकाचा शंभरावा प्रयोग रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये व्हावा हे नाटकाच्या निर्मात्या मानसी केळकर आणि किरण केळकर यांचे स्वप्न होते. त्यानुसार रविवार, ३ डिसेंबर २०२३ रोजी 'यदा कदाचित रिटर्न्स'चा शंभरावा प्रयोग रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सादर करण्यात आला. या प्रयोगाला ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल, ज्येष्ठ दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी, निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगावकर, त्यांच्या मातोश्री सुनीला शरद पिळगावकर, भगिनी तृप्ती पिळगावकर, दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेत्री मंगला केंकरे, अभिनेता संजय खापरे, अरुण कदम, पूर्णिमा अहिरे आदी कलाकार मंडळी उपस्थित होती.
यायाप्रसंगी बोलताना सचिन पिळगावकर यांनी संतोष पवार यांच्या लेखन-अभिनय कौशल्याचं तोंड भरून कौतुक केलं. ते म्हणाले की, संतोषची एनर्जी अफलातून आहे. हा सोहळा आहे, प्रयोग नाही. प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी या वयात नाटकाचा पूर्ण प्रयोग पाहिला याचं कौतुक वाटतं. आम्हा सर्व मराठी कलावंताकरीता खूप मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांनी हे नाटक इथपर्यंत पोहोचवलं असून, तेच या नाटकाला पुढेही नेणार आहेत. किरण आणि मानसी केळकर यांनी या नाटकाची निर्मिती करण्याकरीता धैर्य दाखवलं आणि संतोषच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले.
संतोषचा ट्रॉफीवर तसेच पोस्टरवर फोटो येणे हे केवळ संतोषवरील प्रेमापोटी नसून, त्यामागे त्याची खूप मेहनत आहे. हे नाव संतोष तू कमावलेलं आहेस. हि तुझी कमाई आहे, जी कोणीही तुझ्याकडून चोरू शकत नाही. अडीच तास पूर्ण एनर्जीसह मनोरंजन करणं ही साधी गोष्ट नसल्याने सर्व कलाकारांचं अभिनंदन करतो. १९९९पासून संतोषने 'यदा कदाचित'द्वारे हा प्रवास सुरू केला आणि विविध रूपांमध्ये तो समोर आणला. 'यदा कदाचित रिटर्न्स' या नाटकातील मर्म कायम ठेवून संतोषने शेवटही तसाच केला आहे. नाटकाच्या शेवटी डोळ्यांत पाणी आणलंस त्यामुळे संतोष तुझं विशेष कौतुक करतो. तर संतोष माझा लाडका अभिनेता असल्याचं सांगत दिग्दर्शक विजय केंकरे म्हणाले की, आम्ही एकत्र खूप काम केलं आहे. मी त्याला प्रेमाने 'पॉवर' अशी हाक मारतो. कारण त्याच्याकडे अफाट पॉवर आहे.
आपल्या भावना व्यक्त करताना संतोष म्हणाला की, हे नाटक कोरोनाच्या अगोदर रंगभूमीवर आलं होतं. तेव्हा याचे १६७ प्रयोग झाले होते. तेव्हाचे निर्माते पुजारीही इथे आले आहेत. कोरोनामुळे नाटक थांबलं. त्यानंतर पुन्हा नाटक सुरू करण्याचा प्रयत्न केला. मित्र निर्माता दत्ता घोसाळकर सोडून गेल्याने त्या चक्रात आम्ही सर्वजण अडकलो. कॉलेजचा मित्र किरण जेव्हा माझ्याकडे आला, तेव्हा मी नेमका स्लीप डिस्कने आजारी होतो. मी बेडवर होतो. तो रोज मला भेटायला यायचा. तालिमीलाही माझा बेड असायचा. झोपून तालीम केली, पण किरण हटत नव्हता. त्याने विश्वास दाखवल्याने हे नाटक करणं शक्य झालं. शंभर प्रयोग करताना खुप अडचणी आल्या, पण किरण आणि मानसीवहिनी यांच्या दृढ निश्चयाने आणि प्रेक्षकांच्या शाबासकीमुळे आज हे नाटक शंभराव्या प्रयोगापर्यंत पोहोचू शकल्याचे संतोष म्हणाला.
निर्मात्या मानसी केळकर आणि किरण केळकर यांनी 'सोहम प्रोडक्शन्स' आणि 'भूमिका थिएटर्स' या संस्थेच्या माध्यमातून 'यदा कदाचित रिटर्न्स' या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. याचं लेखन-दिग्दर्शन संतोष पवारने केलं आहे.