Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे, १०० वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे, १०० वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन प्रारंभ तंजावर येथे
पुणे - पिंपरी चिंचवड येथे दि. ५-६-७ जानेवारी २०२४ या काळात संपन्न होणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ, मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शाहराज राजे भोसले (१६७०-१७१२) यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून होणार आहे. तंजावर (तामिळनाडू) येथील सरस्वती महालात हे नाट्य वाङमय सुरक्षित असून, नाटककार शाहराज राजे भोसले यांनी एकूण २२ मराठी नाटके लिहिली असून, 'लक्ष्मी नारायण कल्याण' (१६९०) हे पहिले मराठी नाटक मानले जाते. या नाटकात 'लक्ष्मी नारायण' यांच्या लग्नाची गोष्ट चित्रीत केलेली आहे. दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी, सायं. ६.०० वा. नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून व नटराज पूजन करून शंभराव्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ केला जाणार आहे. शंभराव्या नाट्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल हे असून हा नाट्य ग्रंथ वंदन सोहळा ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी दीपक जेकब, तमीळ विद्यापीठ तंजावर कुलगुरू प्रो. थिरूवल्लूवम, छत्रपती शिवाजीं महाराजांचे आठवे वारसदार शहाजी राजे भोसले, नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, कार्यकारी समिती सदस्य गिरीश महाजन, ज्येष्ठ नाट्यकर्मी आनंद कुलकर्णी, विवेकानंद गोपाल आदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने नांदी, गणेश वंदना, नटराज नृत्य व शाहराज राजे भोसले लिखीत 'लक्ष्मी नारायण कल्याण' या नाटकातील प्रवेश नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी व कोषाध्यक्ष सतीश लोटके सादर करणार आहेत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी सांगली येथे ' सं. सीता स्वयंवर ' कार विष्णुदास भावे यांना अभिवादन करून नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात येईल. त्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शाखेकडे नटराज व नाट्य वाङमय सुपूर्द करण्यात येणार आहे. १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार असून सर्व कार्यक्रमांना रसिकांनी व नाट्यकर्मींनी उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.