मी तिची मुलगी आहे, या सत्यापासून मी पळ काढू शकत नाही- अभिनेत्री जान्हवी कपूर
December 15, 2023
0
*मी तिची मुलगी आहे, या सत्यापासून मी पळ काढू शकत नाही- अभिनेत्री जान्हवी कपूर*
आजच्या पिढीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आणि दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी हिची कन्या असलेली जान्हवी कपूर, अलीकडेच एका बैठकीत सहभागी झाली होती. तिने नेसलेल्या चमकत्या काळ्या रंगाच्या साडीत जान्हवी कमालीची सुरेख दिसत होती.
याच कार्यक्रमात, एका भावनिक क्षणी जान्हवी कपूर तिची आई- दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिच्याबाबतही खुलेपणाने बोलली. भारतीय चित्रपट उद्योगावर आपल्या अभिनयाने अमिट छाप उमटवलेली श्रीदेवी आजही जान्हवीकरता एक स्फूर्ती स्थान आणि प्रेरक शक्ती आहे.
श्रीदेवीची मुलगी असल्याचे एक अनामिक ओझे, एक प्रकारचा दबाव कसा होता, याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली, “तिने जे केले ते कुणी अभिनेत्री करू शकेल असे मला वाटत नाही, कुणीही तिच्याइतके अष्टपैलू आहे असेही मला वाटत नाही. आई ज्या पातळीवर अभिनय करायची, त्या तोडीचा अभिनय- मी तर राहू द्या, आणखी कुणी करू शकेल असे मला वाटत नाही! आजच्या पिढीतही, अभिनेत्रींची तुलना तिचा नृत्यातील पदन्यास, त्यातील अचूकता, तिचे प्रत्येक सादरीकरण याच्याशी केली जाते… मला आणि माझ्या बहिणीला, सुरुवातीला तिच्या मुली असण्याचा खूप ताण यायचा, खूप अस्वस्थ व्हायला व्हायचं, श्रीदेवीची मुलगी हे ओझे वागवताना दमछाक व्हायची, पण नंतर मला कळायला लागलं की, माझी तुलना माझ्या आईशी (श्रीदेवी) केली जात आहे, हे तर हे एक गुणवत्तेचं मानक आहे!
मला असं वाटतं की, यांतूनच मला प्रेरणा मिळू लागली.. आणि खरं तर, आईने मला सांगितलं होतं की, माझ्या पहिल्या चित्रपटाची आणि अभिनयाची तुलना तिच्या पहिल्या चित्रपटाशी केली जाणार नाही, तर ही तुलना तिच्या अखेरच्या चित्रपटाशी केली जाईल,” आई मला म्हणाली होती, “हा असा दबाव तर माझ्या शत्रूवरही येऊ नये.”
तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलताना जान्हवी पुढे म्हणाली, “जेव्हा मी माझ्या पहिल्या चित्रपटासाठी काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी कमालीची सावध होते की, मला आईपासून पूर्णत: अलिप्त राहायचे होते, काहीही असो, लोकांना असंच वाटे की, मी श्रीदेवी कपूरची मुलगी असल्यामुळे मला पहिला चित्रपट मिळाला. मला माहीत नाही की, मी अशा कुठली वाट शोधत होते, जिथे मी माझ्या आईची कोणतीच मदत घेणार नाही, मी माझ्या आईच्या अभिनयाच्या शैलीपेक्षा पूर्णपणे भिन्न अभिनय करेन असे ठरवले होते. आईला सेटवर येऊ नकोस, असं सांगायचे.
मला असं वाटायचं की, मला एक ‘अन्यायकारक लाभ’ मिळतोय- एक हुकमी एक्का. पण आता मला वाटतं की, मी त्या वेळी मूर्ख होते. मी तिची मुलगी आहे, या सत्यापासून मी पळ काढू शकत नाही. आता आई हयात नाही, ही माझी सर्वात मोठी खंत आहे.”