Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दिवाळीतील उत्साह द्विगुणित करणारा 'झिम्मा २'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

*दिवाळीतील उत्साह द्विगुणित करणारा 'झिम्मा २'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित*
दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा सण. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, चलचित्र मंडळी घेऊन आले आहेत 'झिम्मा २'चा धमाकेदार ट्रेलर. दिवाळीचे औचित्य साधत 'झिम्मा २'चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या वेळी निर्माते आनंद एल राय यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याला दिग्दर्शक हेमंत ढोमे, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, संगीतकार अमितराज, गायिका वैशाली सामंत यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. दिव्यांची रोषणाई, रंगीबेरंगी कंदील, रांगोळ्या, उत्साही वातावरण, चमचमीत फराळ आणि पारंपरिक पेहराव असा एकंदर हा दैदिप्यमान सोहळा रंगला होता. यावेळी दिवाळी साजरी करत, चविष्ट फराळाचा आस्वाद घेत कलाकारांनी धमाल केली. यानिमित्ताने 'या' सात मैत्रिणींनी पुन्हा एका रियुनियन साजरे केले.
यापूर्वी 'झिम्मा'मधून या मैत्रिणी प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता 'झिम्मा २'मधून या मैत्रिणींना पुन्हा भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यात या ताफ्यात आता आणखी दोन मैत्रिणी सामील झाल्या आहेत. त्यामुळे आता धमालही दुपटीने वाढली आहे. इंदू (सुहास जोशी) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजिलेल्या या सहलीत काही सरप्राइसेज आहेत, भरपूर धमाल आहे. मागच्या वेळेप्रमाणे ही ट्रीपही अविस्मरणीय होणार असून 'झिम्मा'च्या निमित्ताने बहरलेल्या या मैत्रीची वीण 'झिम्मा २'मध्ये अधिकच घट्ट होणार आहे. त्यामुळे यंदाचे रियुनिअन एकदम बेस्ट असणार, हे नक्की !
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' खरंतर 'झिम्मा'मध्ये दिसलेल्या या मैत्रिणी फक्त पडद्यावरच नाही तर पडद्यामागेही तशाच एकमेकींना जीव लावणाऱ्या आहेत. त्यामुळे 'झिम्मा २'मध्ये त्यांची ही मैत्री अधिकच घनिष्ट दिसणार आहे. सात मैत्रिणी, सात तऱ्हा. प्रत्येकीची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी आहे. देहबोली वेगळी आहे. परंतु समान गोष्ट एकच आहे ती म्हणजे त्यांचे एकमेकांविषयी असलेले प्रेम. 'झिम्मा' पाहून सहलीला गेलेल्या मैत्रिणी 'झिम्मा २' पाहून दुसऱ्यांदा सहलीचे आयोजन करतील, हे नक्की! 'झिम्मा२' हा प्रत्येक प्रेक्षकवर्गासाठी आहे. बऱ्याचदा दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वत्व गमावतो आणि त्याचाच शोध तुम्हाला 'झिम्मा २'मध्ये गवसणार आहे.“
निर्माते आनंद एल राय म्हणतात, ''झिम्मा २ माझ्यासाठी खास आहे, तो एका यशस्वी चित्रपटाचा सिक्वेल आहे म्हणून नाही. तर ज्या लोकांचा या चित्रपटात सहभाग आहे त्यांच्यामुळे हा माझ्यासाठी खास आहे. प्रेमळ आणि जीवाला जीव लावणारे चित्रपटातील कलाकार आणि टीम यांच्यामुळे तो खास आहे. मनाला भावणारी कथा जी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. मला खात्री आहे, प्रेक्षक या चित्रपटाला भरपूर प्रेम देतील.’’
कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चिलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित 'झिम्मा २' येत्या २४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.