ओरिजनल 'नथुराम गोडसे' पुन्हा एकदा रंगमंचावर!* लवकरच ८१८ वा प्रयोग
November 20, 2023
0
*ओरिजनल 'नथुराम गोडसे' पुन्हा एकदा रंगमंचावर!*
लवकरच ८१८ वा प्रयोग...
सखाराम बाईंडर, हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, आई रिटायर होते, गांधी विरुद्ध सावरकर, घर तिघांचं हवं, सोयरीक, आकाश पेलताना, सविता दामोदर परांजपे अशी अनेक उत्तमोत्तम नाटके मराठी रंगभूमीला देऊन मराठी रंगभूमीचे अवकाश विस्तारण्यास सहाय्यभूत ठरलेल्या माऊली प्रॉडक्शन्स चे अजून एक वादग्रस्त नाटक म्हणजे 'मी नथुराम गोडसे बोलतोय...!' या नाटकानेही मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला आणि सारी नाट्यसृष्टी ढवळून निघाली. राष्ट्रपिता समजल्या जाणाऱ्या महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुरामची बाजू मांडणाऱ्या या नाटकाचे लेखन ज्येष्ठ नाटककार कै. प्रदीप दळवी यांनी केले आणि ते नाटक दिग्दर्शित करण्याचे धाडस मराठी रंगभूमीवरील त्यावेळचे डॅशिंग दिग्दर्शक विनय आपटे यांनी केले.
'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नावानेच त्यावेळी महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आणि नाटकावर बंदी आणण्याचे सत्र सुरू झाले. तरीही माऊली प्रॉडक्शन्सचे संचालक आणि नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी त्यावेळी यशस्वीपणे लढा दिला आणि नाटक कोर्टाच्या विवादातून मुक्त केले. नाटक सेन्सॉर संमत करावे लागले. त्यानंतरही अनेक वेळा या नाटकावर विविध पद्धतीने दबाव आणायचा राजकीय प्रयत्न झाला, नाटकाची बसही सामानासकट जाळण्याचे प्रयत्न झाले, त्यातील एक यशस्वी ठरला; परंतु तरीही रंगभूमीची प्रामाणिक सेवा करणारे उदय धुरत नाटकाच्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यांनी सातत्याने प्रयोग सुरूच ठेवले. नाटकावर जेव्हा जेव्हा गंडांतर आले तेव्हा तेव्हा त्यांनी न्यायालयीन लढा दिला. न्यायदेवतेनेही त्यांना योग्य न्याय मिळवून दिला असे म्हणायला हरकत नाही. नवीन कलाकारांना त्यांनी या नाटकात त्यावेळी संधी दिली आणि नाटकाबरोबरच त्यांनाही मोठे केले. मध्यंतरीच्या काळात माऊली प्रॉडक्शन्सने नाटक काही कारणास्तव थांबवले तेव्हा ८१७ प्रयोग धडाडीने पूर्णत्वास नेले होते. मात्र पुन्हा एकदा माऊली प्रॉडक्शन्सच्या ओरिजनल नाटकाचा लवकरच ८१८ वा प्रयोग रंगभूमीवर सादर होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. नाटकाचे पुनर्दिग्दर्शन विवेक आपटे करीत असून कै. विनय आपटे यांच्या तालमीत तयार झालेल्या वैचारिक आणि कलात्मक बैठकीचा प्रभाव त्यांच्या या नाटकात पाहायला मिळेल. नथुराम यांच्या वयाच्या जवळपास जाणाऱ्या वयाचा अभिनेता त्यांना या नाटकासाठी हवा होता, तो शोध आता पूर्ण झाला आहे.
नव्या नाटकात संगीतकार अशोक पत्की, नेपथ्य प्रकाश परब, रंगभूषा प्रदीप दरणे, वेशभूषा नाना गुजर, दृक्श्राव्य संकलन अभिमान आपटे, ध्वनी संकेत रुपेश दुदम, जाहिरात संकल्पना अक्षर कमल शेडगे अशी तंत्रज्ञांची चांगली फळी काम करीत आहे. नाटकाच्या मागे उभे असणारे आणि गेली ५० वर्षे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ निर्माते उदय धुरत, निर्मिती सूत्रधार श्रीकांत तटकरे, निर्मिती प्रशासक चैतन्य गोडबोले, तसेच निर्मिती सहाय्यक प्रणित बोडके, सूत्रधार भगवान गोडसे यांचे योगदान महत्वाचे आहे.
या नाटकात आकाश भडसावळे, चिन्मय पाटसकर, सुजित देशपांडे, तेजस बर्वे, स्वप्निल फडके, अमित जांभेकर, समर्थ कुलकर्णी, गौरव निमकर विविध व्यक्तिरेखा साकारत असून नथुराम गोडसेंच्या मुख्य भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले झळकणार आहे. नाटकाच्या जोरदार तालमी सुरू असून नव्या तंत्रांसह, नव्या ढंगात, तितक्याच ताकदीचा आणि वेगळ्या धाटणीचा 'दुसरा नथुराम' ८१८ वा प्रयोग घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.