Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दसऱ्याला झाले CINTAA टॉवरचे उद्घाटन -दिग्गजांनी पाहिलेले स्वप्न अखेर साकार

दसऱ्याला झाले CINTAA टॉवरचे उद्घाटन -दिग्गजांनी पाहिलेले स्वप्न अखेर साकार मुंबई- दिलीप कुमार यांच्यासह सुनील दत्त, अमजद खान, आशा पारेख, चंद्रशेखर, अमरीश पुरी, दारा सिंग, राम मोहन या दिग्गजांनी एक स्वप्न पाहिले होते. आणि ते स्वप्न होते सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या टॉवरचे. आज त्यांनी पाहिलेले हे स्वप्न सत्यात उतरत आहे. मुंबईच्या आलिशान उपनगर असलेल्या आणि बॉलिवुडचे माहेरघर म्हटले जाणाऱ्या अंधेरी (प.) येथे सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचा टॉवर उभा राहिला असून आता CINTAA ला स्वतःचा कायमचा पत्ता प्राप्त झाला आहे.
स्वतःची इमारत असलेली CINTAA ही सिनेसृष्टीतील कलाकारांची एकमेव युनियन आहे. CINTAA टॉवर दुमजली आलिशान सभागृहाने सुसज्ज आहे. या टॉवरमुळे बॉलिवुडमधील भूतकाळातील कलाकारांनी पाहिलेले स्वप्नच एक प्रकारे पूर्ण झाले आहे. ही इमारत आधुनिक वेलफेअर सेंटर, कॉन्फरन्स रूम, कॅफेटेरिया, कार्यशाळेसह सुसज्ज झालेली आहे. "आमच्या दिग्गजांनी नुसती स्वप्ने पाहिली नाहीत. तर त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या कलाकार, तंत्रज्ञाच्या हिताचे रक्षण करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. अशा या कलाकारांबद्दल जे सध्या या जगात नाहीत त्यांना श्रद्धांजली म्हणून CINTAA टॉवरमध्ये एक वॉल ऑफ फेम तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे या इमारतीचे स्वप्न पाहाणाऱ्यांची सदोदित आठवण येथे येणाऱ्यांना होईल” अशी माहिती CINTAA चे सरचिटणीस अमित बहल यांनी दिली. “चार दशकांहून अधिक काळ नि:स्वार्थपूर्वक केलेल्या कामाचेच हे फळ आहे” असे सांगून अमित बहल पुढे म्हणाले, "आम्ही भाग्यवान आहोत, आम्हाला असे कलाकार मिळाले ज्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या सहकलाकारांना गरज असताना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याकडे लक्ष दिले.”
CINTAA च्या इतिहासाची माहिती देत अमित बहल म्हणाले, “1991 मध्ये, दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, अमजद खान आणि आशा पारेख यांच्यासह भारतीय चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांनी एकत्र येऊन सिने आर्टिस्ट वेल्फेअर ट्रस्ट (CAWT) ची स्थापना केली, ही CINTAA ची भगिनी संस्था आहे. चित्रपट श्रेत्रातील कलाकारांच्या कल्याणासाठी मदत मिळवणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या या उपक्रमाचा कळस म्हणजेच हा टॉवर. हा टॉवर हे त्यांनी केलेल्या समर्पणाचे प्रतीक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.” “या महान कलाकारांनी CINTAA सदस्यांना फायदा व्हावा म्हणून जुहू-वर्सोवा लिंक रोडवर टॉवर बांधण्यासाठी एक भूखंड सरकारकडून १९९१ मध्ये आरक्षित करवून घेतला होता. मात्र कोस्टल रेग्युलेशन झोनच्या निर्बंधांमुळे तो भूखंड त्यांना सोडावा लागला होता. सरकारने त्याबदल्यात त्यांना नवीन भूखंड दिला. 2011 मध्ये दिवंगत दिलीप कुमार, आमिर खान आणि जॉनी लीव्हर यांच्या हस्ते टॉवरची पायाभरणी करण्यात आली होती. अशी माहितीही अमित बहल यांनी दिली.
CINTAA टॉवरचे भव्य उद्घाटन शोमन सुभाष घई आणि आशा पारेख यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून वर्सोवा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार डॉ. भारती लवेकर म्हणून उपस्थित राहाणार आहेत. याशिवाय या कार्यक्रमाला राज बब्बर, जॅकी श्रॉफ, जॉनी लीव्हर, इला अरुण, बोमन इराणी, गौरव चनाना, अमोल गुप्ते, पंकज त्रिपाठी, गोविंद नामदेव, रजित कपूर, श्याम कौशल, रणवीर शौरी, सीमा पाहवा, प्रीती सप्रू, शिशिर शर्मा, लेफ्टनंट कर्नल केके पुरी, ईरम फरीदि, नंदिता पुरी, इशान ओम पुरी, यांच्यासह CINTAA आणि CAWT चे सदस्य मनोज जोशी, अमित बहल, प्रीती सप्रू, दर्शन जरीवाला, राजेश्वरी खान, अय्युब खान, टीना घाई, जया भट्टाचार्य, अभय भार्गव, दीपक काझीर केजरीवाल , रवी झंकाळ इत्यादीही उपस्थित राहाणार आहेत.
"अभिनेते जनतेला स्वप्न पाहण्यास सक्षम करतात. यावेळी, आम्ही आमचे, आमच्या कलाकार, तंत्रज्ञांसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करीत आहोत. आज आम्ही अत्यंत आनंदी आहोत, कारण आमचे इतक्या वर्षांचे अथक प्रयत्न यशस्वी झाले आणि आमचे एक स्वप्न अखेर साकार झाले." असेही अमित बहल यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.