Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या 'कलम ३७६' चित्रपटाचे पोस्टर लाँच*

*महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या 'कलम ३७६' चित्रपटाचे पोस्टर लाँच* *सचिन धोत्रे दिग्दर्शित चित्रपट* हजारो वर्षांची संस्कृती सांगणाऱ्या भारत देशात स्त्रियांवरील अत्याचार हा मोठाच सामाजिक प्रश्न आहे. त्यातही स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषणाचा प्रश्नाचा वेध घेणाऱ्या कलम ३७६ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला' अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या कलम ३७६ या चित्रपटाची निर्मिती आशिष धोत्रे आणि समीर गोंंजारी यांनी केली आहे. सचिन धोत्रे आणि रवींद्र माठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन, तर एम. बी.अल्लीकट्टी यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. फाईलवर ठेवलेलं पिस्तुल आणि मागे भिंतीवर सावरकरांचा फोटो, महाराष्ट्र पोलिसची पाटी दिसते. त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
आतापर्यंत अनेक चित्रपटांतून स्त्रियांते प्रश्न हाताळण्यात आले आहेत. मात्र स्त्रियांचं लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार कायद्याच्या दृष्टिकोनातून, हार्डहिटिंग पद्धतीनं, कोर्टरूम ड्रामा पद्धतीनं मांडल्याची उदाहरणं मराठीत अगदीच मोजकी आहेत. त्यामुळे "कलम ३७६" हा चित्रपट कथानक कशा पद्धतीनं मांडणार याकडे लक्ष लागले आहे. चित्रपटाविषयी दिग्दर्शक संतोष धोत्रे म्हणाले, की लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. गेल्या चार दशकांत इतर गुन्ह्यांच्या तुलनेत बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक वाढले असून गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आपण मागे पडत आहोत. दोन वर्षांच्या मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत बलात्काराच्या बळी ठरत आहेत. अशा स्थितीत कोणतीही कठोर कारवाई करण्याऐवजी आपल्या चुका लपवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणारे नेहमीच नवनवीन सबबी शोधत असतात. वृत्तमाध्यमांतून महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगाच्या बातम्या रोज दाखवल्या जातात, पण ते रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची कुठेही चर्चा होत नाही. असे अत्याचार कधी थांबणार? आपण फक्त मूक प्रेक्षक बनून आपली पाळी येण्याची वाट पाहणार आहोत का? मुलींवर अत्याचार पूर्वीही होत होते आणि आजही होत आहेत. ते थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर...? आजही आपल्या समाजात अत्याचार करणारे खुलेआम फिरतात आणि निष्पाप पीडित मुलीकडे वाईट आणि अपमानास्पद नजरेने पाहिले जाते. समाज किंवा सरकार आपली जबाबदारी नीट पार पाडत नाही. अशा परिस्थितीत मुलीला सुरक्षित वाटेल, ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. याच मुद्द्यांचा वेध चित्रपटात घेतला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.