जिओ स्टुडिओजचा भव्यदिव्य संगीतमय चित्रपट “मानापमान"च्या चित्रीकरणास सुरूवात!
October 21, 2023
0
*मध्य प्रदेशमध्ये आजपासून जिओ स्टुडिओजचा भव्यदिव्य संगीतमय चित्रपट “मानापमान"च्या चित्रीकरणास सुरूवात!*
सुपरहिट संगीतमय चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' नंतर पुन्हा एकदा अभिनेता - दिग्दर्शक सुबोध भावे, चित्रपट "मानापमान" द्वारे भव्यदिव्य संगीतमय नजराणा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेवून येण्यास सज्ज झाले असून, आज ग्वालियर मध्ये चित्रपटाची संपुर्ण टीम शूटींगसाठी पोहचली असून पुढचे काही दिवस ओरछा मधील विलक्षण ठिकाणी चित्रपटातील खूप महत्वाचे सीन शूट केले जाणार आहेत. बहुप्रशांसित चित्रपट कट्यार काळजात घुसली आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'मी वसंतराव', 'गोदावरी' आणि 'बाईपण भारी देवा'चे बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यश साजरे केल्यानंतर जिओ स्टुडिओज् आता कृष्णाजी खाडिलकर लिखित "संगीत मानापमान" या प्रसिद्ध नाटकावरून प्रेरित होवून ही नवीन संगीतमय कलाकृती घेऊन येत आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत "मानापमान" चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील वेगवेगळ्या नेत्रदीपक ठिकाणी होणार असून, आकर्षक वेशभूषा आणि सुमधुर संगीत चित्रपटाची ठळक वैशिष्ट्ये आहेत . अजूनही मुख्य पात्रांची ओळख गुलदस्त्यात असून कलाकारांची नावं जाणून घेण्यासाठी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहेत.