आदिशक्ती ‘मुक्ताई’ रुपेरी पडद्यावर*
October 25, 2023
0
*महाराष्ट्राच्या अलौकिक संत पंरपरेचा इतिहास उलगडणार*
*आदिशक्ती ‘मुक्ताई’ रुपेरी पडद्यावर*
महाराष्ट्रात ज्या स्त्री संत आपल्या कर्तृत्वाने अजरामर झाल्या त्यात ‘संत मुक्ताई’ यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी ‘मुक्तपणे मुक्त, ‘श्रेष्ठपणे श्रेष्ठ’, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई’।। असे वर्णन केले आहे.
संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वाना परिचित आहेत. माऊलींप्रमाणेच त्यांचेही आयुर्मान तुलनेने तसे फारच कमी होते. मात्र, त्यांच्या हातून घडलेले कार्य हे सर्वार्थाने महान असेच ठरले. मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेचे सिद्ध जीवन होते. छोट्या आयुष्यात या जगन्मायेने संत कवयित्रींच्या काव्यानुभवांचा पाया रचला. स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. अशा ‘मुक्ताई’ च्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘मुक्ताई’ हा भव्य आध्यात्मिक मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय.
‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांना मिळत असलेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘मुक्ताई’ चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले आहेत. ‘मुक्ताई’ चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
दिग्पाल लांजेकर लिखित ‘मुक्ताई’ या एकल नाट्याने २०१६ ते २०२० या काळात प्रायोगिक नाटयक्षेत्र गाजवले. २०१८ मध्ये राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD), दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थिएटर ऑलिम्पिक्स मध्ये या नाटकाला सादरीकरणाचा विशेष सन्मान मिळाला होता. ‘गेली ८ वर्ष हे नाटक रुपेरी पडद्यावर आणण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे आणि त्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला ज्ञात होतील’, या उद्देशाने ‘मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात.