*व्हॅक्युम क्लिनर आणि एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाने उघडणार यशवंत रंगमंदिराचा पडदा*
नाट्यरसिकांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या 'यशवंतराव नाट्यगृहात लवकरच तिसरी घंटा खणाणणार आहे. शनिवार ५ ऑगस्टला अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ आणि रविवार ६ ऑगस्टला प्रशांत दामले फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकांच्या प्रयोगाने यशवंत रंगमंदिराचा पडदा उघडणार आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या दोन्ही नाटकाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.
नूतनीकरण करण्यात आल्यानंतर हे नाट्यगृह १ ऑगस्ट पासून नव्या रंगरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नाटयपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसंच विश्वस्त मंडळ ह्यांनी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावं ह्यासाठी प्रयत्न केले होते. या नाट्यगृहाचा पडदा उघडल्याने नाट्यरसिक सुखावले आहेत.