स्टार प्रवाहवर ४ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोजना भरभरुन प्रतिसाद मिळत असून नवी गोष्ट आणि नव्या पात्रांना भेटण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. प्रेमाची गोष्ट मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे अभिनेता राज हंचनाळे. या मालिकेत तो सागर कोळी हे पात्र साकारणार आहे. प्रेमाची गोष्टच्या निमित्ताने राजचं स्टार प्रवाहसोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे.
सागर कोळी या पात्राविषयी सांगताना राज म्हणाला, ‘प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळेच मला इतकी मोठी संधी मिळाली आहे. मी याआधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी अशी ही व्यक्तिरेखा आहे. सागरचा त्याच्या पत्नीनेच विश्वासघात केल्यामुळे लग्नसंस्थेवर त्याचा विश्वास नाही. मनाने अतिशय चांगला मात्र तितकाच धीरगंभीर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो एका गोड मुलीचा बाबा आहे. लहानग्यांसोबत सीन करणं हा वेगळा अनुभव असतो. त्यांचा अभिनय खूपच निरागस असतो. त्यामुळे अभिनेता म्हणून ही भूमिका साकारताना माझा कस लागतोय.
मालिकेची संपूर्ण टीम खूप छान आहे. मालिकेच्या प्रोमोला जो भरभरुन प्रतिसाद मिळतोय तोच प्रतिसाद आमच्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका प्रेमाची गोष्ट ४ सप्टेंबरपासून रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’