*यशवंतराव नाट्य संकुल प्रेक्षकांसाठी सज्ज*
‘यशवंतराव नाट्य संकुल’ या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. अनेक दिग्गज कलावंतांच्या कलाविष्काराने पावन झालेली ही वास्तू आहे. गेले काही दिवस नूतनीकरण सुरु असलेली ही वास्तू आता कलावंतांसाठी आणि प्रेक्षकांसाठी सज्ज झाली आहे. बहुप्रतीक्षित असलेले ‘यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल’ १ ऑगस्ट पासून रसिकांसाठी खुले होणार आहे. सदर संस्थांनी प्रयोग करण्यासाठी नाट्य संकुल व्यवस्थापकांकडे रीतसर अर्ज सादर करावेत, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले ह्यांनी केले आहे.
आधुनिक, अद्ययावत अशा या नाट्य संकुलात सुरेख अंतर्गत सजावट, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज रंगमंच, ध्वनियंत्रणा, स्वछतागृह आदि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोबत या नव्या वास्तूत पार्किंग स्लॉटची खास व्यवस्था करण्यात आली आहे.
३० मे पासून या नाट्यगृहाचे काम जोरात सुरु झाले होते. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर श्री. प्रशांत दामले, नवीन कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसंच विश्वस्त मंडळ ह्यांनी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावं ह्यासाठी प्रयत्न केले. याच प्रयत्नांमुळे येत्या १ ऑगस्ट पासून हे नाट्य संकुल सज्ज होत आहे.
नव्याने दिमाखात सुरु झालेलं हे नाट्य संकुल रसिक आणि नाट्य कलावंतांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे, असे सांगतानाच, रंगभूमीच्या हितासाठी जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिलं आहे.