निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव ‘आयकॅानिक डिरेक्टर ॲाफ दि यिअर’पुरस्काराने सन्मानित
मनोरंजन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारी ‘मिड डे शोबिझ आयकॅान्स २०२३’ पुरस्कार यंदा युवा दिग्दर्शक, निर्माता श्रेयश जाधव यांना मिळाला असून मराठी विभागात ‘आयकॅान डायरेक्टर ॲाफ दि यिअर’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी बॅालिवूडमधील अनुपम खेर, मनोज बाजपेयी, सनी लिॲानी, नुशरत भरूचा, फातिमा साना, सोनू निगम, सुभाष घई, पेन स्टुडिओजचे जयंतीलाल गाडा आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रेयश जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील एक असे तरूण नाव आहे, ज्यांनी अल्पावधितच आपले स्वतःचे एक वेगळे स्थान प्रस्थापित केले आहे. त्यांनी प्रेक्षकांना नेहमीच वैविध्यपूर्ण आशयाचे, जॅानरचे चित्रपट दिले. श्रेयश जाधव यांची निर्मिती असलेल्या ‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासह इतर नामांकित असे ३२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी ॲानलाईन बिनलाईन, बसस्टॅाप, बघतोस काय मुजरा कर अशा बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली. २०१९ मध्ये श्रेयश यांनी खेळावर आधारित ‘मी पण सचिन’ या प्रेरणादायी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. तर नुकताच एक धमाकेदार विनोदी चित्रपट ‘फकाट’ त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. त्यालाही सिनेरसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या बऱ्याच चित्रपटांचे लेखन हे त्यांनी स्वतःच केले आहे. तरूणाईला आवडणारे, कौटुंबिक चित्रपट बनविणाऱ्या श्रेयश जाधव यापूर्वी यांना ‘विदर्भ रत्न पुरस्कार २०२१’ने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल श्रेयश जाधव म्हणतात, ‘’ हा पुरस्कार मिळाल्याचा मला निश्चितच आनंद झाला आहे. मात्र माझ्यावरची जबाबदारीही तितकीच वाढली आहे. मराठी सिनेसृष्टीला नावीण्यपूर्ण आशय देण्याचा प्रयत्न मी यापुढेही सुरू ठेवेन. माझ्या या यशामध्ये माझे कुटुंब, सहकारी, मित्रपरिवार या सगळ्यांचा वाटा आहे.’’