जीवन प्रवासाची अनुभूती घडवणारा 'जर्नी'
सचिन दाभाडे फिल्म प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित, दिग्दर्शित 'जर्नी' चित्रपट येत्या सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. नात्याचा आणि आयुष्याचा अर्थ शिकवणाऱ्या या 'जर्नी'मध्ये शुभम मोरे, माही बुटाला, निखिल राठोड या बालकलाकारांची प्रमुख भूमिका असून याव्यतिरिक्त या चित्रपटात शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने प्रशांत तपस्वी यांच्याही मुख्य व्यक्तिरेखा आहेत. रवींद्र मठाधिकारी लिखित या चित्रपटाची कथा सचिन दाभाडे यांची आहे. तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला सहनिर्माते आहेत.
प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. मग तो पर्यटनासाठीचा असो अथवा आयुष्याचा. या प्रवासात अनेक चढउतार असतात. अनेक गोष्टींचे महत्व आपल्याला या दरम्यान कळते. आयुष्याच्या या प्रवासाचा अनुभव देणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या पोस्टरमध्ये एक लहान मुलगा पाठमोरा उभा दिसत आहे. त्याचा आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रवास आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याची ही 'जर्नी' त्याला कोणत्या वळणावर नेणार, हे लवकरच कळणार आहे. या चित्रपटाच्या वितरणाची धुरा बॅाक्स हिट मुव्हिजच्या अनुप जगदाळे आणि मोनालिसा बागल यांनी सांभाळली आहे.
दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे या चित्रपटाबद्दल म्हणतात, '' या चित्रपटात दाखवण्यात आलेली जर्नी म्हणजेच कुटुंबाशी, नात्यांशी आणि स्वतःशी असलेली लढाई आहे. या लढाईत अनेक भावना, गोष्टी उलगडत आहेत. एका लहान मुलाच्या आयुष्यातील हा प्रवास असून प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा.''