*सुहास शिरवळकर परिवारातर्फे आयोजित आणि स्टोरीटेल इंडिया प्रायोजित प्रख्यात साहित्यिक - लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ, सु.शि. कादंबरी लेखन स्पर्धेचा निकाल घोषित!*
सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ (त्यांच्या २० व्या स्मरणदिनानिमित्त आणि ७५ व्या जन्मदिनानिमित्त) आयोजित केलेल्या कादंबरी लेखन स्पर्धेत एकूण २१ लेखक सहभागी झाले होते. त्यांपैकी लेखक रवींद्र भयवाल लिखित ‘’मिशन गोल्डन कॅट्स’’, या कादंबरीची निवड परीक्षकांनी विजेती कादंबरी म्हणून केली आहे.
लेखक रवींद्र भयवाल यांचे सुहास शिरवळकर परिवार, स्टोरीटेल इंडिया व परीक्षकांतर्फे अभिनंदन करण्यात आले असून सर्व सहभागी लेखकांनी केलेल्या प्रयत्नांसाठी व सहकार्यासाठी त्यांना धन्यवाद व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून, प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी, हृषीकेश गुप्ते तसेच स्टोरीटेल इंडियाचे भारताचे प्रमुख योगेश दशरथ यांनी काम पाहिले. या कामात सुहास शिरवळकर यांच्या साहित्याचे अभ्यासक, अजिंक्य विश्वास व सुधांशू अंबिये यांनी त्यांना साहाय्य केले.